जल जीवन मिशन ः कोट्यवधी घरांमध्ये नळाद्वारे पाणी
न्यूज भारती - मराठी 22-Mar-2024
Total Views |

२१ मार्च हा ‘जागतिक जल दिन’. या दिवसाच्या निमित्ताने पाण्याचे महत्त्व सर्वांनी लक्षात घ्यावे, हा मुख्य उद्देश आहे. देशात २०१९ मध्ये प्रारंभ झालेल्या ‘जल जीवन मिशन’द्वारेही अशाच पद्धतीचे काम सुरू आहे. प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे स्वच्छ पाणी देणारे हे अभियान यशस्वी होत आहे.
देशाच्या ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला घरी स्वच्छ आणि पुरेसे पाणी स्वतंत्र नळाद्वारे २०२४ पर्यंत पोहोचवण्यासाठी ‘जल जीवन मिशन’ची स्थापना करण्याची घोषणा १५ ऑगस्ट २०१९ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. आपल्या सरकारच्या दुस-या कार्यकाळातील त्यांची ही एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. त्यानुसार सुरू केलेल्या या मिशनअंतर्गत प्रत्येक भारतीय घराला बंद नळातून स्वच्छ व शुद्ध पाणी देण्याबरोबरच वापरलेल्या पाण्याचा फेरवापर आणि पर्जन्य जल संधारणाच्या (रेन वॉटर हार्वेस्टिंग) माध्यमातून म्हणजेच पाणी जिरवून पाणी साठ्याची शाश्वतता निश्चित करणे या कामांचादेखील समावेश आहे.
‘जल जीवन मिशन’ ही जन भागीदारीतून राबवली जात असलेली योजना आहे. या योजनेद्वारे केंद्र सरकारने राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेश यांना साहाय्य करणे, त्यांचे सबलीकरण करणे आणि त्यांना सुविधा व आर्थिक साहाय्य पुरवणे ही कामे केली आहेत. या योजनेत ग्रामीण भागातील लोकसेवा आस्थापना म्हणजे ग्राम पंचायत इमारत, शाळा, प्राथामिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी केंद्र यांचा देखील समावेश केला आहे. या सर्व ठिकाणी घरगुती नळ कनेक्शन देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
योजनेचा वेग
ही योजना जाहीर करण्यात आली तेव्हा म्हणजेच १५ ऑगस्ट २०१९ रोजी भारतामध्ये ३ कोटी २३ लाख ६२ हजार ८३८ घरांमध्ये स्वतंत्र नळजोडणी अस्तित्वात होती. सन २०२२ अखेरीस ही संख्या ११ कोटी ४७ लाख १३ हजार ४९५ झाली. म्हणजेच या योजनेअंतर्गत पहिल्या ३ वर्षांत ८ कोटी २३ लाख ५० हजार ६५७ घरांमध्ये नळ जोडण्यात आले.
२०१४ मध्ये सत्तेवर येण्यापूर्वी आपल्या देशातील साऱ्या जनतेला त्यांच्या जीवनमानात सुधारणा करून त्यांना आत्मसन्मान मिळवून देण्याचे आणि मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे वचन देण्यात आले होते. ते वचन केंद्रातील सरकारने विविध योजना आणि अभियाने यांच्या माध्यमातून पूर्ण केले आहे.
प्रतिनिधी
(महाराष्ट्र नॉलेज सेंटर)