वसुधैव कुटुम्बकम् ही भारतासाठी घोषणा नाही किंवा एखाद्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे ते घोषवाक्यही नाही. हा भारतीयांचा जीवनव्यवहार आहे आणि तो भारताने अलीकडेच सिद्धही करून दाखवला. १६ मार्च या राष्ट्रीय लसीकरण दिनाच्या निमित्ताने भारताच्या असाधारण कामगिरीची ही दखल...
१६ मार्च हा दिवस भारतात राष्ट्रीय लसीकरण दिवस म्हणून साजरा केला जातो. परंतु हा दिवस का साजरा करतात किंवा यादिवशी नेमके काय करायला हवे, याची अनेकांना माहिती देखील नसेल ! लसीकरणाचे महत्त्व आपल्याला कोविड-१९ महामारीच्या काळातच प्रकर्षाने जाणवले. राष्ट्रीय लसीकरण दिवसाचा इतिहास पाहिला तर, देशात १६ मार्च १९९५ या दिवसापासून तोंडावाटे दिल्या जाणाऱ्या पोलिओ लसीचा डोस सुरू करण्यात आला. या दिवसाने भारतात लसीकरणाचे महत्त्व हळूहळू पटू लागले आणि जनजागृती निर्माण होऊ लागली. त्यामुळे हा दिवस भारत सरकारच्या पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत साजरा केला जातो. भारतातून पोलिओचे उच्चाटन करण्यासाठी या कार्यक्रमानुसार ० ते ५ वर्ष वयोगटातील मुलांना आजही पोलिओ लसीचे दोन थेंब दिले जातात.
जागतिक पातळीवर विचार केला तर, एखाद्या राष्ट्राच्या उभारणीसाठी, त्या देशातील शारीरिक आणि बौद्धिकदृष्ट्या निरोगी असलेले नागरिक महत्त्वपूर्ण योगदान देतात. त्यामुळेच आपल्या देशातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे हे सरकारचे एकप्रकारे कर्तव्य असते. २१ व्या शतकातील बदलत्या जीवनशैलीमुळे नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे आणि त्यांच्या आजारपणात परवडणारे उपचार उपलब्ध करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. स्वातंत्र्यानंतरच्या काळात नागरी आरोग्याच्या प्रश्नांना फारसे गांभीर्याने पाहिले गेले नव्हते, देशात काही अपवाद वगळता मजबूत आरोग्य व्यवस्थेसाठी पायाभूत सुविधा निर्माण झाल्या नव्हत्या. होत्या त्या अपुऱ्या व्यवस्था होत्या. लसीकरणाचा विषय देखील ग्रामीण स्तरावर पोहोचण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या. गेल्या दहा वर्षात मात्र या परिस्थितीत अनेक सकारात्मक बदल झाल्याचे जाणवत आहे.
आपण हे कोविड काळात देखील अनुभवले. केंद्र सरकारकडून नागरिकांचे मोफत लसीकरण केले गेले. परंतु इथेही राजकारण केले गेले. नागरिकांमध्ये अफवा पसरवल्या गेल्या. त्या शंका कुशंकांमुळे अनेकांनी लस घेण्यास नकार दिला, हे सरकारसाठी खूप मोठे आव्हान होते, परंतु सरकाने ते लीलया पेलले आणि १४० कोटी लोकसंख्येच्या आपल्या देशात कोविडचे यशस्वी लसीकरण करून दाखवले. त्याच बरोबरीने १०० हून अधिक देशांना कोविडचे डोस देऊन वैक्सिन मैत्रीच्या माध्यमातून भारताच्या जगमैत्रीचे, तसेच वसुधैव कुटुम्बकमचेही दर्शन घडवले.
देशात कोविडचा पहिला रुग्ण सापडला तेव्हा देशात स्वतःची यंत्रणा नव्हती, तसेच उपाय नव्हते, लसही नव्हती. तिथून सुरु झालेला आपला प्रवास वसुधैव कुटुम्बकमचा आपला विचार अधिक दृढ करण्यापर्यंत पोहोचला. आर्थिक सर्वेक्षण २०२२-२३ च्या अहवालात भारताच्या राष्ट्रीय कोविड-१९ लसीकरण कार्यक्रमाला मिळालेल्या यशाचे तपशीलवार वर्णन करण्यात आले आहे. ६ जानेवारी २०२३ पर्यंत, देशात २२० कोटी पेक्षा जास्त कोविड लस मात्रा (डोस) दिल्या गेल्या होत्या. यामागे केंद्र सरकारची प्रचंड मेहनत आणि इच्छाशक्ती महत्त्वाची होती. या अंतर्गत ९७ टक्के पात्र लाभार्थ्यांना कोविड-१९ लसीची किमान एक मात्रा देण्यात आली आणि सुमारे ९० टक्के पात्र लाभार्थ्यांना दोन्ही मात्रा मिळाल्या आहेत. हे एकप्रकारे लसीकरण मोहिमेचे यशच आहे. कारण लस उपलब्ध असेल, परंतु प्रशासकीय यंत्रणा कुचकामी असेल, तर तो लसीकरण कार्यक्रम निष्फळ ठरला असता. त्यामुळेच केंद्र सरकारच्या या यशस्वी लसीकरण मोहिमेचे महत्त्व लक्षात घ्यावे लागेल.
कोविड-१९ महामारीच्या विरोधात भारतीय लसीकरण मोहिमेने यशस्वी लढा दिला. लसीकरणाची जगभर प्रशंसा देखील झाली. हे खरेतर आपल्यासाठी आत्मनिर्भरतेचे प्रतिकच होते. देशांतर्गत आणि जागतिक पातळीवर भारतीय लसीला मान्यता मिळण्यापासून ते नागरिकांनी लस घेण्यापर्यंत अनेक आव्हाने असताना देखील दोन्ही लसीकरणाचे टप्पे पूर्ण झाले. यामध्ये लाखो आरोग्य कर्मचाऱ्यांनी देखील योगदान दिले. भारताने आपला सांस्कृतिक स्वभाव दर्शवत जगाला वॅक्सिन मैत्रीच्या माध्यमातून कोविडच्या लसींचा पुरवठा केला. सरकारने २० जानेवारी २०२१ पासून लस पुरवण्यास सुरुवात केली आणि ‘वसुधैव कुटुंबकम’चा आपला सांस्कृतिक स्वभाव जगाला दाखवून दिला. या मोहिमेत २८ कोटींपेक्षा जास्त डोस भारताने इतर देशांना पुरवले आणि या लसीचे हक्क स्वतःकडे न ठेवता ती सर्वांना उपलब्ध करून दिल्यामुळे जगात वेगळा ठसा उमटला.
याकाळात आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी आणि सर्वसामान्यांपर्यंत ही सेवा वेळेत पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारने डिजिटायझेशनला विशेष प्रोत्साहन दिले. याकाळात भारत सरकारने प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचा केलेला वापर जगासाठी आदर्श ठरला. CoWin आणि आरोग्य सेतू अॅपच्या माध्यमातून कोविड प्रतिबंधक लसीकरणाचा जगातील सर्वात मोठा कार्यक्रम राबवण्यात आला.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकारने केलेल्या उपाययोजना आणि नागरिकांची घेतली गेलेली काळजी हा जगासमोर एक आदर्श आहे. केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर विविध क्षेत्रात झपाट्याने सकारात्मक बदल घडत गेले. तसेच ते आरोग्यासारख्या सरकारदरबारी काहीशा दुर्लक्षित राहिलेल्या क्षेत्रातही घडले. त्याचाच परिणाम म्हणून कोविडविरोधात लढाईला बळ मिळाले. सरकारने सर्वात प्रथम कोणता कार्यक्रम हाती घेतला असेल, तर ते ‘स्वच्छ भारत अभियान’ ! त्यानंतर देशाच्या आरोग्य व्यवस्थेत आमूलाग्र सुधारणांचा वेग वाढत गेला आणि लसीकरणाचा हा इतिहास घडला.
देशात दोन वर्षापर्यंतच्या बालकांच्या आणि गरोदर महिलांच्या लसीकरणासाठी सरकारने २०१४ मध्ये मिशन इंद्रधनुष्य सुरु केले. या अंतर्गत लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला आणि २०१७ साली इन्टेन्सिफाइड मिशन इंद्रधनुष्य सुरू करण्यात आले. देशातील प्रत्येक गरजवंतापर्यंत पोहोचणे हे या कार्यक्रमाचे ध्येय होते. २०२२ सालापर्यंत ४.१ कोटी लसीकरणाचा टप्पा पार करण्यात आला आहे. यामुळे बालक आणि मातांच्या आरोग्याची जोखीम कमी झाली असून, या लसीकरण कार्यक्रमाचे कौतुक आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील झाले आहे. त्याचप्रमाणे इतर आजार उद्भवू नयेत यासाठीही लसीकरण केले जात आहे.
लसीकरण हा एक प्रतिबंधात्मक उपाय म्हणून समोर आलेला पर्याय आहे. आजार कोणताही असो, त्यावर उपलब्ध असलेली लस घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि याकरिता इतरांमध्येही जनजागृती निर्माण करायला हवी, हाच संकल्प आजच्या राष्ट्रीय लसीकरण दिनी करायला हवा !
वसुधैव कुटुम्बकम् हे जी-२० या आंतरराष्ट्रीय परिषदेचे बोधवाक्य होते. ही संपूर्ण परिषदच या संकल्पनेवर आधारलेली होती. संपूर्ण पृथ्वी ही एकच कुटुंब आहे, म्हणजेच वसुधैव कुटुम्बकम्. ही भारतापुरती घोषणा नाही किंवा घोषवाक्यही नाही, तर भारताने जगातील अनेक देशांना मदत करून वसुधैव कुटुम्बकम् हा आमच्यासाठी जीवनव्यवहार आहे, हे दाखवून दिले आहे
प्रतिनिधी
(महाराष्ट्र नॉलेज सेंटर)