'... बेटी पढाओ'

News Bharati Marathi    16-Mar-2024
Total Views |
'... बेटी पढाओ'
 

महिलांविषयी केंद्र सरकारने जशी अत्यंत संवेदनशीलता दाखवली आहे, तसेच महिलांना विविध क्षेत्रांमध्ये संधी कशा उपलब्ध होतील अशी धोरणे आखल्यामुळे आणि ती राबवल्यामुळे २०१४ नंतर तंत्रज्ञानविषयक शिक्षण घेणाऱ्या महिलांची संख्या देशात वाढली आहे. विज्ञान, उद्योग, अभियांत्रिकी, गणित या विषयांचे शिक्षण जवळजवळ ४३ टक्के महिला घेत आहेत. ‘चंद्रयान’, ‘गगनयान’, ‘मिशन मंगल’ या अवकाश मोहिमांत महिला वैज्ञानिकांचा मोठा सहभाग होता. लष्करातही महिलांची संख्या वाढते आहे. ‘नारी शक्ती’चा सन्मान ही नवीन भारताची ओळख आहे. ‘पद्म’ पुरस्कार देऊन समाजाला अपरिचित असलेल्या महिलांच्या कार्याचा सन्मान हे भारताच्या अमृत काळाचे वैशिष्ट्य आहे. या काळातील पहिल्या अर्थसंकल्पात ‘महिला सम्मान बचतपत्र’ ही योजना सुरू करण्यात आली.
 
 
 
 
beti padhao

सर्व वयोगटातील महिलांच्या समस्या सोडविण्याचे प्रयत्न आज केले जात आहेत. महिलांना रोजगार-स्वयंरोजगाराच्या संधी मिळतील, त्यांचे सबलीकरण होईल यादृष्टीने केंद्र सरकारने अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. गर्भवती महिलेच्या गर्भाला पौष्टिक आहार मिळावा यासाठी ‘मातृवंदना योजना’ सुरू करण्यात आली आहे. महिलांच्या बँक खात्यात पैसे भरण्यास सुरुवात करण्यात आली आहे. माता-मृत्यू रोखण्यासाठी, नवजात अर्भकांना वाचवण्यासाठी, बाळाचा जन्म रुग्णालयातच व्हावा यासाठी काही कार्यक्रम तयार करण्यात आले आहेत. स्त्री-गर्भ मातेच्या गर्भातच मारून टाकला जाऊ नये यासाठी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ असे जनआंदोलन सुरू करण्यात आले. या प्रयत्नांना लक्षणीय यश येत आहे.

 
एकेकाळी देशातील सत्तर कोटी घरांमध्ये बँक खातेच नव्हते. पण ‘जनधन योजने’अंतर्गत पन्नास कोटींहून अधिक बँक खाती उघडण्यात आली आहेत आणि महत्त्वाचे म्हणजे, त्यातील सत्तर टक्के खाती महिलांच्या नावाने उघडण्यात आलेली आहेत. त्यामुळे अनेक योजनांतून मिळणारा लाभ थेट महिलांच्या खात्यात जमा होत आहे. महिलांविषयीचा जिव्हाळा, महिला सक्षमीकरण आदी पूर्वी फक्त भाषणांमधूनच मांडले जाणारे विषय सरकारच्या कृतीतून प्रत्यक्ष अनुभवायला मिळत आहेत, ते असे.
 
 

ऋता मनोहर बावडेकर
(लेखिका ज्येष्ठ पत्रकार आहेत.)