ग्राहक पंचायत - नागरिक कर्तव्याचा आविष्कार

News Bharati Marathi    15-Mar-2024
Total Views |


bindu-madhav-joshi

ग्राहकांच्या हितासाठी आपल्या देशात पहिल्यांदा कायदा संमत झाला तो १९८६ मध्ये. ग्राहक हितासाठी देशात काम करणारी एक महत्त्वाची संघटना म्हणून अखिल भारतीय ग्राहक पंचायत या संघटनेची ओळख सांगता येईल. या संघटनेची स्थापना १९७४ मध्ये झाली आणि संस्थापक होते बिंदूमाधव जोशी. ग्राहकांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी आपल्या देशात ग्राहक संरक्षण कायदा तयार झाला पाहिजे, यासाठी बिंदूमाधव जोशी यांनी सातत्यपूर्ण आणि यशस्वी प्रयत्न केले. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना त्यांनी या कायद्याची आवश्यकता पटवून दिली आणि नंतर पुढे राजीव गांधी यांच्या कार्यकाळात २४ डिसेंबर १९८६ या दिवशी संसदेत ग्राहक संरक्षण कायदा संमत झाला. बिंदूमाधव जोशी यांच्या कर्तृत्वाचीच ती साक्ष होय.
 
ग्राहक कायद्याच्या माध्यमातून जिल्हा स्तरावर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद, ग्राहक तक्रार निवारण मंच तसेच राज्य ग्राहक आयोग नियुक्त करण्यात आला. महाराष्ट्रात जेव्हा (१९९५-९९) भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीचे सरकार होते, तेव्हा मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या मंत्रिमंडळात ग्राहक कल्याण उच्चाधिकार समितीचे जोशी अध्यक्ष होते. त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा होता.
 
ग्राहक चळवळीचे प्रणेते, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी तसेच कुशल संघटक आणि अभ्यासू, प्रभावी वक्ते अशी जोशी यांची ओळख होती. बालपणापासूनच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याशी जोडले गेले होते. दादरानगर हवेली येथील पोर्तुगीज राजवटीच्या विरोधात झालेल्या सशस्त्र उठावात जोशी यांनी भाग घेतला होता. पुढे गोवा मुक्तिसंग्रामातही त्यांचा सहभाग होता. त्यांनी १९७४ मध्ये ‘अखिल भारतीय ग्राहक पंचायती’ची स्थापना केली आणि पुढे ही ग्राहक चळवळ देशव्यापी झाली.
 
ग्राहकांनी त्यांच्या हक्कांसाठी एकत्र यावे आणि एखादी संघटना स्थापन करून त्या संघटनेच्या माध्यमातून ग्राहकांचे म्हणजेच या देशातील नागरिकांचे हित जोपासले जावे, ही ग्राहक पंचायत संघटना स्थापन करण्यामागची मुख्य भूमिका आहे. नागरिकांनीच समाजहितासाठी काही गोष्टी कराव्यात, ही संकल्पना सुरुवातीपासूनच ग्राहक पंचायतीने प्रभावीपणे मांडली आणि त्यामुळेच हे काम देशभर विस्तारले. या कामाला लोकमान्यता मिळाली, राजमान्यता मिळाली आणि समाजमान्यताही मिळाली, हे विशेषत्वाने सांगावे लागेल. गाव तेथे ग्राहक पंचायत असे लक्ष्य ठेऊन हे काम सुरू आहे.
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा १५ ते १७ मार्च दरम्यान नागपूर येथे होत आहे. समाजहितासाठी पंचपरिवर्तन या विषयावर या बैठकीत व्यापक विचार केला जाणार आहे. या पंचपरिवर्तनामध्ये प्रामुख्याने सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण, स्व आधारित व्यवस्थेचा आग्रह आणि नागरिक कर्तव्य यांचा समावेश आहे. ग्राहक पंचायत हा नागरिक कर्तव्याचाच एक आविष्कार आहे. सर्व काही दुसऱ्या कोणीतरी करावे, अशी भूमिका न ठेवता समाजासाठी माझी कर्तव्य काय आहेत आणि मी ती कशा पद्धतीने पार पाडली पाहिजेत, याचा विचार यानिमित्ताने मांडला जात आहे. नागरिक कर्तव्यांचे पालन म्हणजे अगदी सोप्या शब्दात सांगायचे तर शाळेत जे नागरिकशास्त्र शिकवले जाते, त्यात जी कर्तव्य सांगितली जातात त्यांचे पालन. प्रत्यक्षात त्याचेच पालन होत नाही, ही समस्या आहे. त्यामुळेच नागरिक कर्तव्यांचे पालन आणि त्यासाठी आग्रह धरणे महत्त्वाचे ठरणार आहे. ग्राहक पंचायतीकडून सुरू केलेले काम हाही त्याचाच एक भाग म्हटला पाहिजे.